Lockdown सूट : उघडणार महामार्गावरील ढाबे, दारूच्या दुकानांबद्दल झाला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   केंद्र सरकारने लॉकडाऊन २.० दरम्यान २० एप्रिलपासून अनेक महत्वाच्या सेवा आणि व्यवसायांना शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार रेस्टॉरंट्स तर उघडणार नाही, पण महामार्गावरील ढाबे उघडले जाऊ शकतात. विशेषत: ट्रक चालकांना लक्षात घेत हा निर्णय घेतला गेला आहे. दारूची दुकाने सुरू करण्याबाबत कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही.

महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आले असून गृह मंत्रालयाने याबाबत बुधवारी सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. या निर्देशात असे म्हटले आहे की, या कामांना शिथिलता देण्यासोबत राज्य सरकारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे कि सर्व कार्यालये आणि व्यवसाय केंद्रांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन केले जाईल. कोरोना संक्रमण असलेल्या किंवा हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेल्या भागात हे व्यवसाय चालू होणार नाहीत.

रेस्टॉरंट आणि ढाब्यांबाबत हे आहेत निर्देश

सर्व रेस्टॉरंट्स बंद राहतील, परंतु महामार्गावरील ढाबे उघडले जातील, असे या सूचनेत म्हटले आहे. वस्तुतः लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात अनेक ट्रक चालक रस्त्यावरच अडकले आणि त्यांना खाण्यापिण्याच्या खूप अडचणी आल्या. कदाचित हेच लक्षात घेत सरकारने हा निर्णय घेतला असून ट्रक दुरुस्तीची दुकानेही खुली राहतील.

दारूच्या दुकानांबाबत काय म्हटले

सरकारने दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला नसून बरेच लोक यामुळे निराश होऊ शकतात. याशिवाय बारदेखील पूर्वीप्रमाणेच बंद राहतील. ‘सर्व सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, चित्रपटगृहे, बार आणि ऑडिटोरियम ३ मे पर्यंत बंद राहतील,’ असे या निर्देशात म्हटले आहे.

विशेष म्हणजे काही राज्य सरकारला असे वाटत होते की दारूचा व्यवसाय सुरू केला पाहिजे, कारण ते न उघडल्यामुळे त्यांचे खूप नुकसान होत आहे.