3 मुलं असतानाही सासूच्या पार्थिवाला सुनेनं दिला खांदा, बाळाला कडेवर घेऊन केले अंत्यसंस्कार !

 पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन कऱण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, देवरिया इथे एक अशी घटना घडली असून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले आहे. सलेमपुर गावची रहिवाशी असलेल्या सुमित्रा देवी यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. तीन मुले असतानाही त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कोणीही जवळ नव्हते.

तिघेही नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि लॉकडाउन असल्याने ते अडकून पडले होते. शेवटच्या क्षणी सुमित्रा देवी यांच्याजवळ त्यांची सून होती. सासूच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा प्रथा परंपरा यांना सद्य परिस्थितीत बाजूला ठेवून सुनेने पुढाकार घेत सर्व स्वत:हून केले. स्थानिक प्रशासनाची मदत घेत तिने सासूच्या पार्थिवाला खांदा दिला आणि पाळण्यात खेळणार्‍या मुलाला घेऊन तिने पुढचे विधी पार पाडले.

लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी कामाला असलेल्या मुलांना आईच्या पार्थिवाला खांदा देण्यास येता आले नाही. मात्र, सुनेने ही जबाबदारी खंबीरपणे पार पाडली. तिच्या या निर्णयाचे कौतुकही केले जात आहे. सुमित्रा देवी यांची तिन्ही मुलं बाहेरगावी असतात. शुक्रवारी सुमित्रा देवी यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर सुनेने त्यांना जवळच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे डॉक्टरांनी सुमित्रा देवींना मृत घोषित केले होते. सासूचा मृत्यू झाल्याची माहिती सुनेने पतीसह इतरांना दिली. मात्र लॉकडाउनमुळे कोणीही येणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत सुनेलाच अंत्यसंस्कार करण्यास त्या मुलांनी सांगितले. अचानक ओढवलेल्या या संकटात दुसरा पर्यायही समोर नव्हता. तेव्हा पाळण्यातल्या मुलाला कडेला घेऊन तिने सासूवर अंत्यसंस्कार केले.