Lockdown : सरकारी नोकरदारांना शासनाकडून इशारा, आठवड्यातून एकदा कार्यालयात हजर रहा अन्यथा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून याचा फटका भारताला देखील बसला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाखाच्यावर पोहचली असताना महाराष्ट्रात देखील कोरोना बाधितांचा आकडा 80 हजाराच्या जवळपास पोहचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. गेल्या 2 महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. तसेच शासकिय कार्यालयही ओस पडली आहेत.

राज्य शासनाकडून रेड झोनमध्ये असणाऱ्या कार्यालयात पाच टक्के उपस्थिती बंधनकारक केली असताना काही कर्मचाऱी लॉकडाऊन दरम्यान पूर्व परवानगीशिवाय गैरहजर राहत आहेत तसेच अनेक जण गावी गेल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे कार्यालयीन कामाचे कर्मचारी निहाय समन्वयी वाटप होणे आवश्यक असल्याने शासनाने याबाबत परिपत्रक काढले आहे.

यानुसार प्रत्येक विभागाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे रोस्टर तयार करावे, ज्यामध्ये प्रत्येकाला आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजर रहावे लागेल. वैद्यकीय कारणास्तव रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळता सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन काळात विनापरवानगी मुख्यालय सोडले आहे त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचना सरकारने दिली आहे.

तसेच आठवड्यातून एका पेक्षा जास्त दिवस कर्मचारी हजर राहिला असेल ते वगळून त्या आठवड्यातील अन्य दिवसांची अनुपस्थिती देय विनावेतन रजा म्हणू नियमित करण्यात येणार आहे. हा आदेश 8 जूनपासून अंमलात येणार आहे. राज्य सरकारचे सर्व शासकीय कर्यालये, महामंडळे, आस्थापना यांना हा आदेश लागू असणार आहे.