Lockdown : पुण्यात आज दुपारी 2 वाजल्यापासून कडक ‘कर्फ्यू’, अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना देण्यात आलेले पासही ‘रद्द’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात संचारबंदी असताना देखील वाढती संख्या पाहता पोलिसांनी आज दुपारी दोन पासून “कडेकोट कर्फ्यु” लागू करण्यात आला आहे. शहरात अत्यावश्यक सेवाचे देखील दुकान काही तासासाठी उघडी राहणार असून, त्यात ऑनलाइन आणि घरपोच सेवा देणाऱ्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता पुणे पोलिसांनी दिलेले पासेस रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात आता याची कडेकोट अंमलबजावणी केली जाणार आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यापूर्वी शहरात संचारबंदी केली होती. मात्र तरीही शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तर नागरिक देखील विनाकारण बाहेर पडत असून त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासन सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. मात्र तरीही शहरातील रुग्ण संख्या थांबविण्यात यश येत नसल्याचे दिसंत आहे.

पोलिसांकडून विनाकारण फिरणारे, मास्क न घालणारे तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तीव्र कारवाई केली जात आहे. त्याचा काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.

त्यामुळे आता शहरात आज दुपारी 2 वाजल्यापासून पुढील 7 दिवस म्हणजेच 27 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत शहरात कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर काही प्रमाणात बदल केले आहेत. पालिकेने रविवारी रात्री 12 पासूनच शहर “सील” केले आहे. आता पोलिसांनी शहरात कर्फ्यु लागू केला असून, यापुढे बाहेर पडणे नागरिकांसाठी धोक्याचे ठरणार आहे.

मेडिकल, अत्यावश्यक सेवा आणि गरज असणाऱ्याना पुणे पोलिसांनी त्यांचेच पासेस दिले होते. त्यात जवळपास दीड लाख जणांना पासेस दिले होते. मात्र आता या आदेशानुसार मेडिकल, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच यातून मुभा असणार असून पुणे पोलोसानी दिलेले पासेस चालणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

असे आहेत, नवीन नियम…

१) जीवनावश्यक वस्तू व सेवा (दूध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला) पुरविणारे केंद्रे दिवसभरात केवळ चार तास म्हणजेच सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू असतील.

2) इ-कोमर्स ..
घरपोच किराणा माल, फळे व भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करणेसाठी फिल्पकार्ड, अमेझॉन तसेच इतर ऑनलाईन सेवा देणाऱ्या उद्योगांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कामे करता येणार आहेत. त्याच वेळेत त्यांनी सेवा द्यायची आहे.

३) खाद्यपदार्थ वितरण करण्यासाठी बिग बास्केट, स्वीगी झोमॅटो तसेच इतर ऑनलाइन सेवा देणाऱ्या उद्योगांना सकाळी 10 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सेवा देता येणार आहे.

४) त्यात केवळ अत्यावश्यक व तातडीच्या औषधे ग्राहकांना घरपोच देण्यासाठी सूट असणार आहे.