बीड जिल्ह्यात पुन्हा 10 दिवसांचा कडक Lockdown

बीड : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मराठवाड्यात लॉकडाऊन करायला सुरुवात झाली आहे. नांदेड पाठोपाठ आता बीड जिल्ह्यातही 26 मार्च ते 4 एप्रिल असा 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिका-यांनी केली आहे. बीड नगरपालिका शहर, ग्रामीण भागातही हा आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी पत्रात नमूद केले आहे.

बीड जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात लॉकडाऊन काळात 10 दिवस सर्व व्यवहार बंद राहणार आहे. वाहतूक सेवाही बंद राहणार असून पूर्व परवानगीनेच अत्यावश्यक सेवांसाठी वाहतूक सुरु राहील, असे आदेशात म्हटले आहे. किराणा दुकानदारांना सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत दुकान उघडण्याची मुभा दिली आहे. त्यावेळी सामाजिक अंतर आणि मास्क बंधनकारक केले आहे. दूध, भाजीपाला, फळ विक्री सकाळी 7 ते 10 या वेळतच करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑनलाईन औषध वितरण आणि रुग्णालयाशी संबधित सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे मिशन बिगेन अगेननंतर पहिल्यांदाच 10 दिवसांचा लॉकडाऊन बीड जिल्ह्यात करण्यात आला आहे.