Lockdown : ‘लॉकडाऊन’मुळं Ambulance मिळाली नाही, महिलेनं पोलिसांच्या गाडीत दिला मुलाला ‘जन्म’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. मागील महिन्याभरापासून लोकांना घरातच राहावं लागत आहे. काही महत्त्वाचं आणि अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडावं लागत आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु असताना एका गर्भवती महिलेच्या मदतीसाठी पोलीस धावून आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच महिलेनं एका गोंडस मुलाला पोलिसांच्या गाडीत जन्म दिला. राजधानी दिल्लीतील ही घटना आहे.

एका महिलेला नऊ महिने पूर्ण झाले होते. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागेल याची जाणीव कुटुंबाला झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क साधून मदत मागितली. पोलिसांनी एक महिला कॉन्स्टेबलला सोबत देत आपली गाडी महिलेच्या मदतीसाठी पाठवली. महिला हॉस्पिटलजवळ येताच तिला कळा सुरु झाल्या आणि तिने मुलाल जन्म दिला. पोलिसांनी तातडीने हॉस्पिटलमधल्या नर्सला बोलावून घेतलं आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती केलं. आता दोघांची प्रकृती उत्तम असून महिला आणि तिच्या कटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त दीपक पुरोहित यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, पश्चिम दिल्लीतील ख्याला परिसरात मिनी कुमार हे आपल्या कुटुंबासह राहतात. मिनी कुमार यांनी गुरुवारी महिला पोलिसांकडे मदत करण्याची विनंती केली. या कटुंबाने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती महिला कॉन्स्टेबलकडे केली. महिला कॉन्स्टेबलने ही माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या व्हॅनमधून महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आलं. पण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच महिलेची गाडीत प्रसूती झाली. गुरुवारी रात्री 9.30 ची ही घटना असल्याचे पुरोहित यांनी सांगितले.