रीवामध्ये ‘कोरोना’मुळं वाघिणीचा मृत्यू ? तपासणीसाठी पाठवण्यात आले ‘सॅम्पल’

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील रीवा येथे जगातील एकमेव व्हाइट टाइगर सफारी मुकुंदपूर येथे एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन झाल्यापासून वाघिणी दुर्गा आजारी असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांना याबाबत समजण्यापूर्वीच तिचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे दुर्गाचा मृत्यू झाला.

मार्तंड सिंह व्हाइट टाइगर सफारीचे डायरेक्टर संजय रायखेडा यांनी सांगितले की, वाघीण दुर्गाच्या कोरोना चाचणीसाठीचा नमुना जबलपूरमधील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे, जेणेकरून मृत्यूचे कारण समजेल. त्यांनी सांगितले की तिला सर्दी, खोकला, ताप येणे ही लक्षणे दिसत नव्हती.

संजय रायखेडा यांनी पुढे सांगितले की, दुर्गाचे वय ७ वर्ष होते आणि तिला औरंगाबाद प्राणी संग्रहालयातून मार्तंडसिंह व्हाईट टायगर सफारी (मुकुंदपूर) येथे आणले होते.

कोरोनाचा धोका पाहता वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली असून लॉकडाऊननंतर सफारी बंद करून त्या भागाला स्वच्छ करण्यात आले आहे. तसेच व्हायरसचा धोका टाळता यावा म्हणून कर्मचार्‍यांची ड्युटी देखील चालू आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमधील प्राणिसंग्रहालयात एक वाघीण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची बातमी आली होती. त्यानंतर अमेरिका, भारतासह अनेक देशातील प्राणिसंग्रहालयांना हाय अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. भारतातील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) सस्तन प्राण्यांवर, विशेषत: मांजर, मुंगूस आणि माकडांवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.