उल्हासनगरमध्ये पुन्हा lockdown !

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन टीम –  उल्हासनगर परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरती महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी २२ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा आयुक्तांनी केले असून त्यांच्या या निर्णयाला व्यापारी संघटनेने देखील पाठींबा दिला आहे. उल्हासनगरमध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ३७०० पार गेली असल्यामुळे महापालिका आरोग्य सेवेवरती ताण वाढला आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी डॉ राजा दयानिधी यांनी २ ते १२ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला होता. पण लॉकडाऊन काळात १७०० पेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने महापालिकेच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

रविवारी १२ जुलै रोजी येथील लॉकडाऊन ची मुदत संपणार होती. पण शेजारील सर्वच महापालिकांनी लॉकडाऊन वाढवल्याने, महापालिकेने सुद्धा लॉकडाऊन वाढवावा असे सर्व स्तरातून बोलले जात होते. अखेर आयुक्तांनी शनिवारी एक पत्रक जारी करुन १२ ते २२ जुलै लॉकडाऊन वाढवल्याचे जाहीर केले. शहरातील नागरिकांनी लॉकडाऊनला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला,दूध यांच्यासह मेडिकल नेहमी प्रमाणे विशिष्ट वेळेत सुरु राहतील. किराणा दुकानदारांना ग्राहकांना घरपोच साहित्य द्यावे लागणार आहे. नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केल्यास आपण कोरोना संसर्गावरती विजय मिळवणार असल्याची प्रतिक्रया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली.