Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान अनोखं लग्न, सोशल डिस्टन्सिंग ठेवून पार पाडले धार्मिक विधी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ज्यामुळे लोक घरात कैद असून जनजीवन ठप्प झाले आहे. लोकांना कोरोना विषाणूबद्दल जागरूक देखील केले जात आहे. परंतु या लॉकडाऊन दरम्यान, एक अनोखा विवाह पाहायला मिळाला. या लग्नात वधू-वरांच्या बाजूने केवळ 4-4 सदस्य उपस्थित होते. सामाजिक अंतराच्या अंतर्गत हा विवाह करण्यात आला जेणेकरून कोरोना व्हायरस संसर्ग होऊ नये. मध्य प्रदेशातील सीहोरमध्ये एका अनोख्या लग्नाची नोंद झाली आहे, ज्याने लोकांसमोर जागृतीचे उदाहरण ठेवले आहे.

सीहोर शहरातील गुरुद्वारामध्ये झालेल्या या अनोख्या विवाहात वर-वधूबरोबर व्हराडी मंडळींनीही सामाजिक अंतर पाळले. मोहित किंगर याचे लग्न शहरातील शिवानी बत्राबरोबर आधीच ठरलेले होते, परंतु देशभर पसरलेल्या कोरोना विषाणूचे संकट अचानक देशापुढे आले. 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे सर्व सेवा तसेच वाहतुकीचे मार्गही बंद झाले. अशा परिस्थितीत, विवाह सोहळ्यातील गोष्टींची व्यवस्था करणे एक आव्हान होते.

एक वेळ त्यांनी असा विचार केला की, लग्नाची तारीख वाढविली पाहिजे, परंतु वराच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने लग्नाची तारीख पुढे ढकलणे शक्य झाले नाही. मग सोसायटी व नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार लग्नाच्या विधी केवळ नावापुरत्या केल्या गेल्या. वधू आणि वर यांच्या वतीने केवळ 4 ते 4 लोक सामील झाले. प्रत्येकाने सामाजिक अंतर पाळण्याचा प्रयत्न केला आणि तोंडावर मास्क घातला.