‘कोरोना’ व्हायरस विरूध्दच्या लढाईत जगातील ‘हे’ 5 देश कशामुळं बनलेत ‘मिसाल’ ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस जगभरात पसरला असून आतापर्यंत या व्हायरसमुळे ५३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट तर ही आहे कि विशेषतः विकसनशील देशातील मृत्यूची संख्या जास्त आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी अनेक देशांनी वेगवेगळ्या प्रकारे लढाई सुरु केली आहे. जगातील काही देश तर असे आहेत की, ज्यांनी या लढाईला गंभीरतेने घेतलेले आहे आणि या प्रकरणात इतर देशांच्या तुलनेत पुढे आहेत.

चीनमधील कोरोना व्हायरसची सुरुवात तेथील वुहान शहरामधून झाली. चीनकडे सार्सशी सामन्याचा अनुभव होता आणि हा अनुभव कोरोनाशी सामना करण्यास उपयोगी आला. चीनने या व्हायरसच्या पसरण्याची वाट बघितली नाही तर लागण झालेल्या लोकांची ओळख करण्यास सुरुवात केली.

चीनने मार्चच्या अखेरपर्यंत ३ लाख २० हजार पेक्षा जास्त चाचण्या केल्या. या व्हायरसच्या तपासणीची प्रक्रिया सर्वात पहिले चीनमध्ये विकसित झाली आणि याची माहिती वुहानमध्ये लॉकडाऊनच्या अगोदर २४ जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर पोस्ट केली गेली. हॉंगकॉंगच्या एका टीमने सार्सच्या तपासणीत काम केले होते. चीन जगात सर्वात जास्त केमिकलचे उत्पादन करते. औषधांसाठी कच्चा माल सर्वात जास्त चीनमध्ये तयार होतो. भारत जर जगातील सर्वात जास्त जेनेरिक औषधांची निर्यात करते तर त्याचा कच्चा माल चीनकडून येतो. अशात चीनमध्ये कोरोनाच्या तपासणीसाठी वेगाने किटस तयार केले गेले.

जर्मनीलाही समजले की कोरोना विषाणू जागतिक समस्या बनणार आहे. अशा परिस्थितीत त्यांनीही लढा देण्याची तयारी सुरू केली. बहुतेक देशांना कोरोना चीनमधील देशांतर्गत समस्या वाटत होती. तेव्हा जानेवारीच्या सुरूवातीला बर्लिनचे वैज्ञानिक ओल्फर्ट लँड्ट यांना त्यांच्या संशोधनात असे आढळले की ते सार्ससारखे आहे आणि यासाठी त्याला एक चाचणी किट आवश्यक असेल. जेव्हा जर्मनीमध्ये कोरोनाचा अनुवांशिक क्रम नव्हता, पण ओल्फर्ट आणि त्यांच्या टीमने सार्सवर आधारित किट तयार केले. ही प्रक्रिया जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर १७ जानेवारी रोजी प्रकाशित केली गेली. अर्थात हे काम चीनपूर्वी जर्मनीने केले. ब्रिटिश सरकारनेही या किटला मान्यता दिली. फेब्रुवारीच्या अखेरीस ओल्फर्ट आणि त्यांच्या टीमने ४० लाख किट तयार केले. यानंतर जर्मनीत मोठ्या संख्येने लोकांची चाचणी सुरू झाली. जर्मनीने दररोज १२ हजार लोकांची चाचणी सुरू केली.

दक्षिण कोरियानेही या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेत मोठ्या संख्येने लोकांची चाचणी सुरू केली. अगदी कार पार्किंग आणि मॉल्समध्येही चाचणी घेण्यात आली. त्यावेळी ब्रिटनने हे फार गांभीर्याने घेतले नव्हते. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की कोरोना विषाणूचा प्रसार कदाचित वाढू शकतो. दुसरीकडे दक्षिण कोरियाने वुहानकडून धडा घेतला होता आणि हे समजले होते की हे संक्रमण केवळ वुहानपुरते मर्यादित राहणार नाही. चाचणीत जी सकारात्मक प्रकरणे होती त्यांना दक्षिण कोरियाने वेगळे करण्यास सुरवात केली. दक्षिण कोरियाने दररोज १५,००० लोकांची चाचणी क्षमता विकसित केली. तसेच त्यांनी कोणतेही शुल्क न घेता लाखो चाचण्या केल्या. अनेक ठिकाणी टेस्टिंग बूथ बांधले गेले. चाचणीचे निकाल मोबाईलवर मेसेजेस व फोनद्वारे कळवण्यात आले. परीक्षक किटसह उद्याने, कार पार्किंग आणि मॉल्समध्ये फिरत असत. या सक्रियतेमुळे दक्षिण कोरियाने कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवले.

आईसलँड हा एक छोटा आणि तुलनेने समृद्ध देश आहे. आईसलँडने कोरोना विषाणूच्या चाचणीत कोणतीही चूक केली नाही. तिथे ज्यांच्यात कोणत्याही प्रकारचे लक्षण नव्हते त्यांचीही चाचणी केली गेली. आइसलँडचे साथीरोग तज्ज्ञ थोरोल्फार गुआनसन यांनी बझ फीडला सांगितले की, आईसलँडच्या लोकसंख्येमुळे येथे तपासणीची पुरेशी क्षमता विकसित झाली. ते म्हणतात की, केवळ मोठ्या प्रमाणावर चाचणी केल्यामुळेच हे नियंत्रित केले जाऊ शकले.

जर्मनीनंतर इटलीमध्ये कोरोना विषाणूची सर्वाधिक तपासणी झाली आहे. येथे दोन लाखाहून अधिक लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. असे असूनही जगभरात कोरोना विषाणूमुळे होणारे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले. इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यूची संख्या जर्मनीपेक्षा जास्त आहे. मार्च अखेरपर्यंत इटलीमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यूचे प्रमाण ११ टक्के होते, तर शेजारच्या जर्मनीमध्ये फक्त एक टक्के, चीनमध्ये चार टक्के आणि इस्राईलमध्ये जगातील सर्वात कमी म्हणजे ०.३५ टक्के आहे.

इटलीमध्येही ही चाचणी व्यापक स्तरावर घेण्यात आली आहे, परंतु मृत्यूच्या उच्च दराची अनेक कारणे दिली जात आहेत. उदाहरणार्थ, जपाननंतर इटलीत जगातील सर्वात जास्त वृद्ध लोकसंख्या आहे. याव्यतिरिक्त इटलीमध्ये इन्फ्लूएन्झाने ग्रस्त लोकं मोठ्या संख्येने होते. या प्रकरणात नवीन विषाणूचा संसर्ग सहज पसरतो. इटलीच्या संस्कृतीला देखील कोरोना विषाणूच्या संसर्ग पसरण्याचे एक कारण म्हणून पाहिले जात आहे. कारण येथील समाजात लोकं खूप वेळा भेटतात आणि एकमेकांना चुंबन घेऊन शुभेच्छा देतात.