दारू खरेदीसाठी आता E-टोकन, महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने सुरु केली सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉप मध्ये होणाऱ्या गर्दी पासून सुटका व्हावी आणि कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आता ई-टोकन सुविधी उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा http://www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. हा निर्णय तुर्तास पुण्यापुरता झाल्याचे समजत आहे. मुंबईबाबत निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे.

ई-टोकनची सुविधा http://www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना दारु खरेदी करायची आहे, अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचे आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिनकोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.

संकेतस्थळावर माहिती सबमिट केल्यानंतर त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या वाईन शॉपची यादी दिसेल. त्या दुकानापैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकाला करता येईल. आवश्यक माहिती नमुद केल्यानंतर ग्राहकास ई-टोकन मिळेल. सदर टोकनद्वारे ग्राहक आपल्या सोईच्या वेळी संबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून दारु खरेदी करू शकणार आहे.