‘लॉकडाऊन’मध्ये महिलेनं लढवली ‘शक्कल’ अन् बनली ‘लखपती’, जाणून घ्या

नाशिक : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्ग महामारीचा सर्वात जास्त फटका कोणाला बसला असेल तर तो शेतकऱ्याला. लॉकडाऊन मुळे व्यापारी फळाचे दर पाडून मागत आहेत. शेतात किती दिवस पीक ठेवायच म्हणून शेतकरी मिळेल तो दर घेऊन समाधान मानत आहे. मात्र, नांदूरमध्यमेश्‍वर मधील आदर्श शेतकरी प्राप्त महिलेने लॉकडाऊन काळात सर्व व्यवसाय ठप्प असताना आपल्या बांधावरती सेंद्रिय कलिंगडाचा स्टॉल लावून विक्री द्वारे तब्बल दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.

नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्‍वर येथील सीमा शिंदे आणि रामदास शिंदे यांनी आपल्या एक एकर शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत ‘शुगर क्वीन’ जातीच्या कलिंगडाची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली. त्यांनी कलिंगड लागवड करताना शेतीची नांगरणी करुन रोटाव्हेटर मारून शेणखत व बेसल डोस देऊन मल्चिंगपेपर अंथरून सव्वा फूट अंतरावर बीजारोपण केलं. पाण्यासाठी ठिंबक सिंचनचा वापर करुन सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर केला.

अवघ्या ७० दिवसांमध्ये कलिंगड तयार होऊन त्यातून तीस टन माल तयार झाला. त्यातील २६ टन मोठा तर लहान आकारातील चार टनांचा माल तयार झाला. यासाठी सुमारे एकरी साठ हजार रुपये खर्च आला. मात्र, लॉकडाऊन मुळे त्यांना विक्रीस अडचण येत असल्यामुळे अखेर त्यांनी आपल्या शेताच्या बांधावरच स्टॉल लावून कलिंगड विक्रीचा निर्णय घेतला.

यामधील अठरा टन माल बांधावर सहा रुपये किलोने व्यापाऱ्यास विक्री केला त्यातून त्यास एक लाख आठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर आठ टन कलिंगड त्यांनी दहा रुपये किलो दराने विक्री केले, त्यातून ऐंशी हजार रुपये मिळाले. चार टन लहान आकारामधील कलिंगड साडेतीन रुपये किलोने विकत चौदा हजार असे दोन लाख रुपये कमविले. यात एक कलिंगड तब्बल सात किलो वजनाचे होते. दरम्यान, सेंद्रिय पद्धतीने कलिंगडाला परिसरातून चांगली मागणी मिळाली.