Lockdown 3.0 : गावाला जाऊ द्या मजुरांची ‘हाकाटी’ ! जे काही व्हायचे ते होईल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आता शहर नको, चला गावाला जाऊ अशी हाकाटी देत ग्रामीण तसेच परप्रांतीय मजुरांनी गावचा रस्ता धरला आहे. घरमालकाचा भाड्यासाठी तगादा, पगार संपला, महिना झाला तरी कंपनी सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही, कंपनी मालकाने अजून पगार दिलेला नाही. इथे थांबून काय करायचे, त्यापेक्षा गावाचा रस्ता धरलेला काय वाईट? जे बरे-वाईट होईल ते रस्त्यात होईल, अशी अगतिकता ग्रामीण तसेच परप्रांतीय मजूर व्यक्त करीत आहेत. शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज केला. प्रलंबित अर्जाची संख्या पाहता लवकर ही व्यवस्था होईल, असे वाटत नाही. शासनाविषयी तक्रारी असल्या तरी किमान रस्त्यात आमच्या खाण्याची काही व्यवस्था करावी, ही त्यांची माफक अपेक्षा आहे.

पुणे शहर आणि उपनगरातून सोलापूर, नगर, सातारा रस्त्याने सध्या परप्रांतीय मजूर, स्थलांतरीतांनी पायपीट सुरू केल्याचे दिसत आहे. प्रशासनाविषयी त्रागा व्यक्त करतांना घरी कधी पोहोचू असा एकच प्रश्न ते उपस्थित करतात. करोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्यानंतर यावर नियंत्रणासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने टाळेबंदी लागू केली. टाळेबंदीमुळे अर्थचक्राची चाके जागेवर थांबली आहेत. विशेषत कामगार आणि हातावर पोट असलेला वर्ग यामध्ये भरडला गेला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि उपनगरामध्ये मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातून आलेल्यांची संख्या अधिक आहे. टाळेबंदीमुळे औद्योगिक वसाहतीतील कामे बंद पडल्याने त्या कामावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष विसंबून असणाऱ्या कामगारांना घरी बसावे लागले आहे. हाताला काम नाही आणि खिशात पैसे नाही. त्यामुळे अनेकांनी आपल्या घरचा रस्ता धरला. परंतु, लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी त्यांना अडविण्यात आले. तर कुठे त्यांना परत माघारी पाठविण्यात आले. काहींची निवारागृहात व्यवस्था करण्यात आली.

तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविल्यानंतर पुण्यातील स्थलांतरीतांना विशेष रेल्वेव्दारे गावी पाठविण्यात आले. दुसरीकडे, आपल्या गावाला जाण्यासाठी रितसर शासकीय प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांच्या नशिबात केवळ प्रतिक्षा आल्याने अनेकांनी पायीच रस्ता धरला आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने एप्रिल महिन्याचाही पगार मिळाला नाही. घरमालक भाडे मागत आहेत. जे थोडेफार पैसे शिल्लक होते. ते महिनाभरात खाण्यावर खर्च झाले. जवळ काहीच नाही. इथे थांबून काय करू, हा त्यांचा प्रश्न आहे. इतर राज्यातून आलेल्या मजुरांनी काम नसल्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासासाठी शासनाने दिलेली प्रक्रिया पूर्ण करत असूनही काहीच उत्तर येत नसल्याने त्यांच्यातील अनेक मंडळी लेकराबाळांना घेऊन पायी निघाले आहेत. काहींनी सायकली विकत घेऊन प्रवास सुरू केला. शासन परवानगी देत नसल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नाही, अशी केविलवाणी व्यथा त्यांनी मांडली.

आमची काय चुक?

आम्ही हडपसरमध्ये एका ठिकाणी गोठा देखभालीचे काम करतो. कुटूंबातील मुले मुंबईत लहान-मोठी कामे करतात. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हातात काम राहिले नाही. मुलांना मुंबईहून घरी यायचे होते. परंतु, सरकार परवानगी देत नसल्याने मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत त्यांनी घर गाठले. आता आम्हांला आमच्या मूळ गावी जायचे आहे. परंतु, अजूनही परवानगी नाही. यात आमची काय चूक? घरातला उरलेला किराणा घेऊन आम्ही घर सोडले आहे. जे होईल ते होईल, पण आपल्या माणसांपर्यंत पोहोचायचे आहे.