Lockdown : विनाकारण फिरणार्‍यांना बौद्धिकतेचा डोस देण्यास चक्क ‘यमराज’ रस्त्यावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउन काळात देखील विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना बौद्धिकतेचा डोस देण्यास चक्क आज यमराज आवतरले होते. स्वारगेटमधील जेधे चौकात यमराजानी जनजागृती केली. स्वारगेट पोलिस व विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या जनजागृतीसाठी यमराजाच्या पोशाखात जनजागृती केली गेली.

शहरात लॉकडाऊन आहे. पण तरीही नागरिक बाहेर फिरताना दिसत आहेत. कारवाई आणि वेळोवेळी सांगून पण नागरिक बाहेर पडताना दिसून येत आहेत. त्यामुळे जेधे चौकातून मार्गस्थ होणाऱ्यांसाठी जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, नाहीतर मी तुम्हाला घेउन जाईन, पोलिस व महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करा, स्वयंशिस्त बाळगा, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सचा अवलंब करा, कुटूंबाची काळजी घ्या अशापद्धतीने यमराजाची वेशभूषा केलेल्या विशेष पोलिस अधिकाऱ्याने नागरिकांमध्ये जनजागृती केली.

शहरातील मध्यवर्ती असलेल्या जेधे चौकातून नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. यापाश्र्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांना शाब्दिक डोस देत जनजागृती केली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. विशेष पोलीस अधिकारी रविंद्र हुले व भारत सुराणा सचिन खंडागळे, राजेंद्र झांबरे, अल्ताफ सौदागर यांच्या संकल्पनेतून जनजागृती करण्यात आली.