Coronavirus : संतापजनक ! औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांचा पोलिसांवरच लाठीहल्ला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यातील नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. जिवघेण्या विषाणूपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी नागरिकांनी घरा बाहेर पडू नये यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घरदार सोडून रस्त्यावर चोवीस तास कर्तव्य बजावत आहेत. मात्र, काही ठिकाणी पोलिसांवरच हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत. असाच एक प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे.

दुचाकीस्वारांनी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांवरच लाठी हल्ला केला. या संतापजनक घटनेनंतर दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार आज (गुरुवार) दुपारी घडला. राज्यात संचारबंदी असल्याने औरंगाबाद शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दिल्ली गेटजवळील अण्णा भाऊ साठे चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. आज दुपारी वाहतूक शाखेचे पोलीस जनार्दन जाधव आणि जोनावल हे दोघे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत कर्तव्य बजावत होते.

त्यावेळी दुचाकीवरून तिघेजण ट्रिपल सीट जात होते. संचारबंदीत वाहने चालवण्यास मनाई असल्याने पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. हे तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र धक्कादायक म्हणजे थोड्यावेळाने हे तरूण तोंडाला मास्क लावून आणखी काही तरुणांना घेऊन चौकात आले. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

या टोळक्याने आम्हाला तुम्ही अडवलेच का ? असा सवाल करत पोलिसांशी अरेरावी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना संचारबंदी लागू असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका तरूणाने पोलिसांच्या हातातील काठी हिसकावून घेत पोलिसांनाच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांना मारहाण सुरु झाल्याने महिला पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्यांनी पोलिसांना मारहाण सुरुच ठेवली. पोलिसांना मारहाण करून या टोळक्याने तेथून पळ काढला.

पोलिसांवर लाठी हल्ला झाल्याचे समजता या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांनी या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली आहे. फिरोज फारुख हा या हल्ल्यातील प्रमुख आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.