‘कोरोना’पाठोपाठ PAK मधून भारतात आलं ‘मोठं’ संकट, ‘या’ राज्यात ‘अलर्ट’ जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचे संकट गंभीर होत असताना दुसरीकडे आणखी एक भयानक संकट भारतात आलं आहे. शेतातील उभ्या पिकांवर टोळ किटकांनी हल्ला केला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशानंतर आता हे टोळ किटक उत्तर प्रदेशाच्या दिशेने जात आहे. राज्यातील अनेक जिल्हे टोळच्या जाळ्यात सापडले आहेत. यामुळे उत्तर प्रदेश सरकारला संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करावा लागला आहे.

यूपीतील 17 जिल्ह्यांना विळखा
टोळचा झुंड पाकिस्तानातून राजस्थानमध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पोहचला आहे. राजस्थानातील 18 आणि मध्य प्रदेशातील जवळपास 12 जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान केल्यानंतर हा टोळचा झुंड उत्तर प्रदेशातील झांसी आणि आग्रापर्यंत पोहचला आहे. हे संकट एवढे मोठं आहे की, उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात सतर्कतेची घोषणा केली आहे. टोळांनी उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांना विळखा घातला आहे. यामध्ये प्रामुख्याने आग्रा, अलीगड, मथुरा, बुलंदशहर, हाथरस, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, फारुखाबाद, कानपूर, झांझी, हमीरपूर आणि ललितपरू या जिल्ह्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांना जागरुक करण्यासाठी मोहीम
उत्तर प्रदेश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टोळचा मोठा झुंट कित्येक एकरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करु शकतो. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी व्यापक मोहीम सुरु केली आहे. आग्रामध्ये जिल्हा प्रशासनाने 204 ट्रॅक्टर रासायनिक फवारणीसह तयार ठेवले आहेत. राजस्थानच्या दौसा जिल्ह्यामध्ये 20 मे रोजी टोळ किटक आढळून आला होता. अवघ्या 5 दिवसात ही अजमेरपासून 200 किमी अंतरावर दौसा गाठली आणि उत्तर प्रदेशात दाखल झाले आहे.

दशकातील सर्वात मोठा हल्ला
मध्य प्रदेशातील टोळांनी कमीतकमी 12 जिल्ह्यांतील उभी पिकं नष्ट केली आहेत. गेल्या दशकातील हा टोळांचा सर्वात मोठा हल्ला आहे. राज्यात या टोळाने पहिल्यांदा 17 मे रोजी मंदरौर आणि नीमच गाठले. त्यानंतर आणखी 10 जिल्ह्यांना आपल्या जाळ्यात ओढले. मंदरौर, नीमच, उज्जैन, देवा, शाजापूर, इंदूर, खरगोन, मरैना आणि श्योपूर या जिल्ह्यांना या टोळांचा सर्वाधिक फटका बसला आहे. वारा बदलताच पाकिस्तान व इतर भागातून हे टोळ कीटक भारतात प्रवेश करतात.

टोळ किटक काय असतात ?
हे टोळ किटक पावसामध्ये पाकिस्तानमधून भारताकडे येतात. टोळ नाकतोड्याचाच एक प्रकार आहे. या कीटकामुळे पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यापैकी भारतात खुरपाडी, बिनपंखी, नाकतोडा, पट्टेदार नाकतोडा, भातावरील नाकतोडा इत्यादी नाकतोडे पिकांची हानी करतात.