तुम्ही चीनला मसूद अझहरविरोधात भूमिका घेण्यास का सांगितल नाही ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ला घडवून आणणाऱ्या ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावात खोडा घालणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चीनवरून आक्रमकपणे टीका केली आहे. कमकुवत मोदी हे शी जिनपिंगना घाबरले. भारताविरुद्ध कृती करणाऱ्या चीनविरुद्ध मोदींच्या तोंडून चकार शब्दही निघाला नाही , असा टोलाही त्यांनी लगावला. या टिकेला भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

‘राहुल गांधीजी ट्विटरवर परराष्ट्र धोरण ठरवता येत नाही. परराष्ट्र कूटनीती हा गंभीर विषय असून ट्विट करत ते निश्चित करता येत नाही. असे भाजपने राहुल गांधी यांना सुनावले आहे.

रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर टीका केली. गांधी परिवाराने केलेल्या चुकांचे परिणाम देशाला भोगावे लागत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे . दहशतवाद विरोधातील लढाईतील काँग्रेसच्या कटीबद्धतेवर शंका निर्माण होत असल्याची टीका त्यांनी केली. राहुल गांधींच्या ट्वीटमुळे ते खूश असल्याचे जाणवत आहे. देश दुखात असताना राहुल गांधी खूश का होत आहेत ? असा सवाल त्यांनी यावेळी केला. राहुल गांधींचं ट्विट आज पाकिस्तानात हेडलाइनला असेल असंही ते म्हणाले.

‘राहुल गांधी आपले चीनसोबत चांगले संबंध असल्याचा दावा करतात. डोकलाम वाद सुरु असताना तुम्ही चीनच्या अधिकाऱ्यांना भेटलात. मानसरोवर दौऱ्यावेळी चीनी अधिकाऱ्यांना तुम्हाला भेटायचं होतं . मग मसूद अझहरविरोधात भूमिका घेण्यासाठी तुम्ही आपल्या संबंधांचा फायदा का घेतला नाही ?’,अशी उपरोधिक टीका देखील त्यांनी राहुल गांधींवर केली . २००९ मध्ये यूपीए सरकारच्या काळात देखील चीनने तांत्रिक बाबींवर मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास आक्षेप घेत वाचवले होते. तेव्हा देखील तुम्ही असे ट्वीट केले होते का ? असा सवाल देखील त्यांनी केला.

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनमुळे अपयश आले आहे . त्यावरून भाजप काँग्रेसमध्ये जुंपली आहे.