२०१४ पेक्षा या लोकसभा निवडणुकीत झाले ‘इतके’ पैसे खर्च : आंध्रात एका मताला ‘इतके’ रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात निवडणुकीत होणारा खर्च दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतीय लोकांनी भाजपला मोठ्या मताधिक्याने निवडून देत या लोकशाहीचा आनंद देखील साजरा केला. मात्र इतक्या मोठया प्रमाणात लोकसंख्या असणाऱ्या या देशात निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चाचा आकडा देखील तितकाच मोठा आहे. कारण या लोकसभा निवडणुकीत भारतात जवळपास ६० हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. याविषयी कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही तर हा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्रप्रदेश आणि इतर ३ राज्यात देखील विधानसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या, त्यामुळे त्यांचा देखील खर्च यात सामील आहे. एकूण सात टप्प्यात या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे यासाठी खर्च देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात झाला आहे. सेंटर फॉर मीडिया स्टडिजनं केलेल्या अभ्यासानुसार २०१४ साली लोकसभा निवडणुकीत ३० हजार कोटी रुपये खर्च झाले होते तर या वेळी जवळपास ६० हजार कोटी रुपये खर्च झाले असल्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश आणि इतर राज्यात एका मतासाठी प्रत्येक मतदाराला दोन हजार रूपये वाटण्यात आले आहेत.

दरम्यान, या निवडणूक खर्चात १० ते १२ हजार कोटी रुपये निवडणूक आयोगाचे तर २० ते २५ हजार कोटी हे राजकीय पक्षांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या सगळ्या खर्च आढावा घेऊन त्याचे रिपोर्ट देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य आयोगांना दिले आहेत.