शत्रुघ्न सिन्हा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; पाकिस्तानचे निर्माते जीना यांची केली स्तुती

छिंदवाडा ( मध्य प्रदेश ) : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या तिकिटावर पटनासाहिबमधून निवडणूक लढणारे अभिनेते सिन्हा यांनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांची स्तुती केली आहे. जीना यांनी भारताच्या स्वातंत्र्य आणि विकासातही योगदान दिले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत ते बोलत होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ कमलनाथ यांचे पुत्र नकुलानंद छिंदवाडा येथून निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेस आणि जीना यांची स्तुती करताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की,  ‘काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान आहे. काँग्रेसने देशासाठी मोठे योगदान दिल्यानेच मी काँग्रेसमध्ये आलो आहे. यानंतर पुन्हा कुठेही जाणार नाही. ‘

याच सभेत मोदींवर टीका करताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की , ‘व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो. देशापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. मोदींनी जेव्हा नोटाबंदीनंतर जीएसटी लागू केला तेव्हा तो आंबट लिंबावर कारलं खायला दिल्यासारखं होतं.’

शत्रुघ्न सिन्हा २०१४ मध्ये पटनासाहिब येथून भाजपकडून विजयी झाले होते. मात्र वेळोवेळी त्यांनी पंतप्रधान व भाजपविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा यावेळी भाजपकडून पत्ता कट करण्यात आला. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी २८ मार्चला काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पटनासाहीब मतदार संघातून शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे आव्हान आहे.