भाजपने केला विश्वासघात ; ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीने केला वार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता सनी देओल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वेळातच त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने दिवंगत माजी खासदार विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता खन्ना यांनी नाराजी व्यक्त केली. कविता खन्ना यांनी विश्वासघात झाल्याची भावना बोलून दाखवली आहे.

कविता खन्ना यांच्या ऐवजी भाजपने सनी देओल यांना गुरुदासपूरमधून उमेदवारी दिली आहे. गुरुदासपूर हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा पारंपारिक मतदारसंघ होता. १९९७, १९९९, २००४ आणि २०१४ अशी सलग पाच लोकसभा निवडणुकीत विनोद खन्ना यांनी येथून विजय मिळविला होता. मात्र, विनोद खन्ना यांच्या मृत्युनंतर २०१७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुनिल जाखड हे तब्बल १ लाख ९३ हजार २१९ मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा मिळविण्यासाठी भाजपने सनी देओल यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे.

कविता खन्ना यांनी गुरुदासपूरमधून अपक्ष निवडणुक लढविण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. याबाबत कविता खन्ना यांनी सांगितले की, विनोद खन्नांसोबत आपणही गुरुदासपूर मतदारसंघात २० वर्षे काम केले होते. विनोदजींची प्रकृती बिघडल्यानंतर मी जनतेला भेटायचे. येथील मतदारांना मलाच खासदार म्हणून पहायचे आहे, असे सांगतानाच भाजप आपल्याला तिकीट देईल, अशी अपेक्षा होती असे बोलून दाखविले. अपक्ष निवडणूक लढविण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसून मी सर्व पर्याय तपासून पहात असल्याचे कविता खन्ना यांनी सांगितले.

६२ वर्षाचे सनी देओल निवडणूक लढविण्यासाठी स्वत: फारसा उत्सुक नव्हता. पण भाजपने गळ घातल्यामुळे अखेर त्याने निवडणुक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.