जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पकडली 18 लाखांची रोकड

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभीमीवर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्य़ालयाच्या आवारात १८ लाख ८४ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका दुचाकीच्या डिकीतून ही रक्कम जप्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना चंद्रपूरमध्ये दुचाकीतून रोकड जप्त केली. जप्त करण्यात आलेली रोकड बेहिशोबी असून याप्रकरणी शरद पुंडलिक रामटेके याला ताब्यात घेण्यात आले आहे.

निवडणुकीच्या काळामध्ये २० हजारांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगण्यास बंदी असताना एक इसम दुचाकीमध्ये रोकड घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रामटेके याला ताब्यात घेऊन गाडीची पाहणी केली. त्यावेळी गाडीच्या डिकीमध्ये ही रक्कम आढळून आली. याची माहिती तात्काळ निवडणूक आयोगातील संजय राईंचवार यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ भरारी पथकाला पाठवून ही रक्कम जप्त केली. त्यांना रकमेबद्दल विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने रक्कम जप्त करण्यात आली. याबाबत आता अधिक चौकशी केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मोटेकर, अमोल गंधरे, रवींद्र पंधरे, जावेद सिद्दीकी, मनोज रामटेके, रवींद्र बोरकर यांनी केली.