‘नेत्यांच्या पाया पडायचं नाही’ : राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची सूचना

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या अजिबात पाया पडायचे नाही असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांनी नुकतीच माढा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी बोलताना ते उपस्थिताना संबोधित करत हे वक्तव्य केले. शिवाय आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “या नेत्याच्या पाया पड, त्या नेत्याच्या पाया पड, असा माढा मतदार संघातील इतिहास होता. यापुढे कोणत्याही नेत्यांच्या पाया पडायचे नाही. उपमुख्यमंत्री असताना मी बंगल्यावर पाटी लावली होती, कुणीही पाया पडू नये. कशाला कुणाच्या पाया पडायचं ? असा सवाल करत अजित पवार यांनी पाया पडायचे असेल तर आपल्या आई वडिलांच्या पाया पडा असा सल्लाही दिला आणि मोहिते पाटील कुटुंबाला टोला लगावला.

केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे केवळ थापेबाज सरकार आहे असे म्हणत अजित पवार यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप सरकारवर टीका केली आहे.

अनेक नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणात नेत्यांचे पाय धरण्याची परंपरा जपताना दिसतात. अनेक आमदार, खासदार आणि मंत्री असे आहेत जे आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या पक्षप्रमुखांचे पाय धरताना दिसतात. औरंगाबदचे खासदार चंद्रकांत खैरै हेदेखील एका जाहीर कार्यक्रमात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे पाय धरताना दिसले होते. दुसरीकडे राज्यमंत्री संजय राठोड यांनीही एकदा आदित्य ठाकरे यांचे पाय धरताना दिसून आले होते. तसे पाहिले तर आदित्य ठाकरे हे या दोघाही नेत्यांपेक्षा वयाने फार लहान आहेत. परंतु या घटनांमुळे राजकारणातील पाया पडण्याची संस्कृती समोर आली आहे असे बोलले जात आहे.