मोदींना टोपी-शिट्टी देतो, त्यांनी चौकीदारी करावी

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या भाजपाचं ‘मै भी चौकीदार’ कॅम्पेन जोरात आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी या कॅम्पेनला सुरुवात केली. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे छोटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मै भी चौकीदार’ या मोहिमेची खिल्ली उडवली आहे. ‘पंतप्रधानांना चौकीदार शब्द एवढाच आवडत असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं. त्यांना मी चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देईन,’ असा टोला अकबरुद्दीन ओवेसी यांनी हाणला आहे. रविवारी हैदराबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांनी ही टीका केली.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अकबरूद्दीन ओवेसी म्हणाले, मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी आपल्या नावांच्या मागे ट्ट्विटरवर चौकीदार हा शब्द लावला आहे. त्यांनी फक्त ट्विटरवरच्याच नावात बदल केला. त्यांनी आपले मतदान ओळखपत्र आणि आधार कार्डाच्या नावातही बदल केला पाहिजे. देशाला पंतप्रधान पाहिजे चहावाला किंवा पकोडेवाला नाही. मोदींना खरोखरच चौकीदारी करण्याची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन असंही ते म्हणाले.