अब्दुल सत्तार यांच्या ऑफरचा खोतकरांनी केला खुलासा

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थी नंतर लोकसभा लढण्याचे शिवधनुष्य खाली ठेवले आहे. दानवे खोतकर यांच्या दिलजमाई नंतर खोतकरांनी मोठा खुलासा केला आहे. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी तुम्हाला काय ओफर दिली होती या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अर्जुन खोतकर यांनी दिले आहे.

काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र आहेत. राजकीय उतार चढवामुळे मी दुखावलो गेलो होतो. म्हणून त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट अर्जुन खोतकर यांनी केला आहे. अब्दुल सत्तार हे माझे अनेक वर्षांपासूनचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी मी त्यांच्या बोलावण्यामुळे चहा घेण्यासाठी गेलो होतो. आमच्यात राजकीय घडामोडीवर चर्चा झाल्यामुळेच सत्तार हे गुड न्यूज देण्याचे भाकीत करत होते. मात्र मी शिवसेना सोडणार नाही असे अर्जुन खोतकर यांनी म्हणले आहे.

आपण कडवट शिवसैनिक असल्याने आपण रावसाहेब दानवे यांचे काम करून युतीचा धर्म पाळणार आहे. तसेच रावसाहेब दानवे यांना निवडणुकीत कसलाही दगाफटका करणार नाही असे देखील अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला युतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले आहेत म्हणून मी त्यांचा आदेश शिरसावंद्य मानणार आहे असे अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.