भाजपचे बंडखोर वाकचौरे लढवणार शिर्डीतून अपक्ष निवडणूक

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यावेळी शिर्डीतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिवसेनेकडे त्यांनी लोकसभा निवडणूकीसाठी शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देत वाकचौरे यांची मागणी धुडकावून लावली आहे. त्यामुळे वाकचौरे यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेऊन अपक्ष निवडणूक लढण्याचे ठरवले आहे.

जनतेच्या प्रेमापोटी अपक्ष निवडणूकीला सामोरे जात आहे. निवडणूक जिंकली तर नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपण काम करणार आहे, असे भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले आहे. मागीलवर्षी वाकचौरे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांच्याकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना पराभव स्विकारावा लागला होता.

लोकसभा निवडणूकीमध्ये पराभव झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या चिन्हांवर श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. त्यातही त्यांचा पराभव झाला. भाऊसाहेब वाकचौरे हे आगामी लोकसभा निवडणूकीला शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांच्या समोर मोठे आव्हान उभे करू शकतात. कारण लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे येथील शिवसैनिक नाराज आहेत. त्याचप्रमाणे विखे पाटील नेमका कुणाच्या डोक्यावर हात ठेवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण विखे पाटलांचा आशीर्वाद ज्याला मिळेल त्यालाच या मतदारसंघातून निवडणूक जिंकणे सोपे जाईल असे देखील बोलले जाते आहे.