Loksabha : पुण्याबाबत भाजपने पाळली ‘ही’ अनोखी पंरपरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाने काल रात्री उशीरा आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने अनिल शिरोळे यांचे तिकीट कापून गतवेळी उमेदवारीसाठी उत्सुक असणाऱ्या गिरीश बापट यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपने गिरीश बापट यांना उमेदवारी देऊन एक अनोखी परंपरादेखील पाळली आहे.

पुण्यात भाजपकडून आजपर्यंत कोणत्याच विजयी उमेदवाराला दोनवेळा उमेदवारी देण्यात आली नाही. पुण्यात भाजपचा खासदार म्हणून एकदा निवडून आले की पुढच्यावेळी त्याला उमेदवारी दिली जात नाही. ही परंपरा भाजपने शिरोळे यांच्या रूपाने देखील पाळली आहे. अण्णा जोशी यांना शिरोळे यांच्या प्रमाणे दोन वेळा उमेदवारी देण्यात आली होती. यात ते १९८९ सालच्या लोकसभा निवडणुकीला पराभूत झाले होते. तर १९९१ च्या लोकसभा निवडणुकीला ते निवडून आले होते. त्यानंतर प्रदीप रावत यांना पक्षाने दोनवेळा उमेदवारी दिली होती. त्यात ते १९९९ साली निवडून आले होते. तर शिरोळे यांना २००९ आणि २०१४ साली उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी ते २०१४ साली खासदार झाले होते.

दरम्यान, गिरीश बापट यांना देखील भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. या आधी त्यांनी १९९६ साली भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर आता बापट दूसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तसेच गिरीश बापट हे १९९५ पासून आजतागायत कसबा मतदारसंघाचे आमदार आहेत.