वादग्रस्त भाजप उमेदवाराची मतदान केंद्रावर मुजोरी

उन्नव : वृत्तसंस्था – मला मत द्या अन्यथा मी वाईट शाप देईन, असे वादग्रस्त विधान करणारे भाजपचे उमेदवार साक्षी महाराज यांची मतदान केंद्रावरही मुजोरी पहायला मिळाली. त्यांच्या या मुजोरीमुळे मतदार संतप्त झाले. साक्षी महाराज आज सकाळी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनी रांगेत न येता थेट मतदान केंद्रात प्रवेश केला. त्यामुळे रांगेत उभे असलेल्या मतदारांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

उत्तर प्रदेशमधील उन्नाव लोकसभा मतदार संघातून साक्षी महाराज निवडणूक लढवत आहेत. भाजपने त्यांना पुन्हा या मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. सकाळी आठच्या सुमारास ते मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले होते. यावेळी या ठिकाणी मतदारांनी रांग लावली होती. साक्षी महाराजांनी रांग मोडून थेट प्रवेश करत मतदान केले. त्यामुळे रांगेत शिस्तीत उभ्या असलेल्या मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

साक्षी महाराजांनी रांगेत न येता थेट मतदान केंद्रात जाऊन काही मिनीटात मतदान करून निघून गेले. यावेळी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रांगेत उभे राहून मतदान करतात. मग साक्षी महाराज का उभे राहू शकत नाहीत. तर काही मतदरांनी, रांगेत उभे राहून मतदान करणारे वेडे आहेत का असा संतप्त सवाल यावेळी केला.