भाजपकडून शिवसेनेला २५-२३ च्या फॉर्म्युल्याची ऑफर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूका तोंडावर आहेत असे असताना राज्यात भाजप -शिवसेना युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपानं २४, तर शिवसेनेनं २२ जागा लढवल्या होत्या. मात्र आता भाजपनं आपल्या कोट्यातील एक जागा शिवसेनेला सोडण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपमधीलच सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. मात्र अद्याप यावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

भिवंडी – पालघर शिवसेनेला ?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं २५-२३ चा फॉर्म्युला तयार केल्याची माहिती आहे. भिवंडी किंवा पालघरची जागा शिवसेनेला सोडण्याबद्दल चर्चा सुरू आहे. सध्या या दोन्ही जागांवर भाजपाचे खासदार आहेत. चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघरमध्ये गेल्या वर्षी पोटनिवडणूक झाली. त्यात त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगा पराभूत झाले. मात्र त्यांनी भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना चांगली टक्कर देत जवळपास अडीच लाख मतं मिळवली. त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी सोडली जाऊ शकते.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत २६-२२ असा फॉर्म्युला होता. त्यावेळी भाजपानं स्वत:च्या कोट्यातील दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी हातकणंगलेमधून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. तर महादेव जानकर बारामतीमधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. ते राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंकडून पराभूत झाले. मात्र त्यांनी सुळे यांनी कडवी लढत दिली होती. दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडणाऱ्या भाजपानं २०१४ मध्ये २४ जागा लढवल्या. त्यातील २३ जागा त्यांनी जिंकल्या. तर शिवसेनेनं २२ जागा लढवत १८ जागांवर यश मिळवलं.