मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही ; ‘त्या’ बंडखोरीत माझाच हात : चंद्रकांत पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही, राज्याच्या राजकारणात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यात माझा हात असतो. वसंतदादा घराण्यात झालेल्या बंडखोरीच्या घटनेमागेही माझाच हात आहे. असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगलीतील लोकसभेचे युतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी, आमच्या उमेदवाराविरोधात उभारण्यासाठी कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. सांगलीच्या जागेंसाठी कॉंग्रेसेकडे उमेदवार नसल्याने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडेही चांगला उमेदवार नाही. त्यामुळे भाजपचा याठिकाणचा विजय निश्चित झाला आहे असे त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, वसंतदादा घराण्याने बंडखोरीचा इशारा दिला असेल आणि त्यामागे माझा हात असल्याची चर्चा केली जात असेल तर मी त्या गोष्टी स्वीकारत आहे. अशा चांगल्या गोष्टीत माझा हात नक्कीच असतो असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांनी भाजपमध्ये आयात उमेदवारांचीच गर्दी असल्याची व भाजपची स्वत:ची ताकद कुठेही दिसत नसल्याची टीका केली होती. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना आजवर त्यांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सांभाळता आले नाही. त्यांना योग्य न्यायसुद्धा देता आला नाही. त्यामुळे असे नाराज झालेले लोक भाजपमध्ये समाधानाने येत आहेत. जयंत पाटील यांनी आता भाजपच्या ताकदीवर बोलण्यापेक्षा आहे ते लोक सांभाळण्याचे काम केले तर ते त्यांच्यासाठी चांगले आहे असेही त्यांनी म्हंटले.