जालन्यात उमेदवाराच्या शोधात काँग्रेसची दमछाक

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – जालना मतदारसंघ म्हणजे दानवे खोतकरांच्या वादाने संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती पसरलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात काँग्रेसला विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांच्या तोडीचा उमेदवार मिळत नसल्याने उमेदवाराच्या शोधात काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली आहे.

रावसाहेब दानवे यांच्या सोबत असणाऱ्या राजकीय वैरामुळे शिवसेनेसोबत काडीमोड घेऊन अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये येतील आणि तेच दानवेंचा पराभव घडवून आणतील अशा स्वप्न विलासात काँग्रेसने बराच वेळ दवडला. त्यामुळे आता त्यांची उमेदवाराच्या शोधात चांगलीच दमछाक होत आहे.

उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या घरी सोमवारी रात्री उशिरा पर्यंत बैठक पार पडली मात्र तरीही उमेदवारचा शोध घेण्यास स्थानिक नेत्यांचे एकमत झाले नाही. आ. अब्दुल सत्तार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह भीमराव डोंगरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तायडे आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित होती. त्यानंतर काल मंगळवारी जालन्याचा उमेदवार ठरवण्यासाठी औरंगाबाद येथे बैठक बोलावण्यात आली होती. मात्र त्या बैठकीत हि जालन्याच्या उमेदवाराबाबत स्पष्ट निर्णय घेण्यास नेत्यांना अपयश आले आहे. कल्याण काळे, अब्दुल सत्तार, कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख, शेख महेमूद, कल्याण दळे आदी काँग्रेस नेते या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान पक्षश्रेष्ठींकडून सारखी विचारणा केली जात आहे. त्यामुळे तुम्ही लवकर एकमत करून नाव निश्चित करा असे अशोक चव्हाण यांच्या कडून स्थानिक नेत्यांना सांगण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जालन्यात दानवेंच्या विरोधात पुन्हा कल्याण काळे यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. किंवा बदल म्हणून अब्दुल सत्तार यांना लढण्याचे आदेश पक्ष देण्याची शक्यता आहे.