निवडणूक आयोग मोदींवर कारवाई करणार ?

मोदींच्या 'त्या' विधानाची दखल घेत निवडणूक आयोगानं मागवला रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लातूरमधील औसा येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावानं भाजपला मत द्यावं, असं आवाहन नवमतदारांना केलं. मोदींच्या या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगानं या संदर्भातील रिपोर्ट तात्काळ सादर करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणारे जवान, पुलवामातील शहीद, शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरिबांना पक्की घरे मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातले पहिले मतदान करा, असे आवाहन करत नवमतदारांना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत सैनिकांच्या नावानेच मते मागितली. त्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. तसेच मोदी राजकीय फायद्यासाठी शहीद जवानांच्या नावाचा वापर करत आहेत, असं म्हणत त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षांनी तक्रार केली आहे. त्याची दखल घेत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता काय कारवाई करणार ? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

काय म्हणाले होते मोदी –

‘पहिल्यांदा पगार मिळाल्यानंतर तुम्ही तो स्वतःसाठी ठेवत नाहीत. तुम्ही ते पैसे आई किंवा बहिणीला देता. तसंच तुमचं पहिलं मत एअर स्ट्राइक किंवा पुलवामात शहीद झालेल्या जवानांसाठी द्याल का ? कमळ किंवा धनुष्यबाणावरील बटन दाबल्यानंतर तुम्ही अभिमानानं सागू शकाल की तुमचं मत थेट मोदींना मिळालं.