आता जावयाचे काय करायचे ? दानवेंसमोर पेच

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – जालना लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांनी पुकारलेले बंड शेवटी थंड केल्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समोर पुन्हा एकदा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव हे दानवे यांचे जावई असून, यांनी आता औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कॉंग्रेस कडून त्यांचे नाव आघाडीवर आहे. यामुळे दानवे आता जावयाचे काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरुध्द मी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलतांना म्हंटले आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय हा भाजपा-सेना युतीला विचारात पाडणारा आहे. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समोर एक नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.

मी उभा राहणारच, असे म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणूकीत उभा राहण्याचा निर्धार केला आहे. तसेच माझी  बोलणी ही कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबत झालेली आहे. असे जाधव यांनी सांगितले.

हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांना विचारले असता, त्यांनी मात्र दानवे यांच्याकडे बोट दाखवत तेच आता काहीतरी करतील, जाधव हे दानवें यांचे जावई आहेत,  त्यामुळे आता दानवे, जावई यांचा पेच कसा सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.