‘लाज कशी वाटत नाही’ ची उडाली धुम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कॅची व लोकांना चटकन समजेल अशी घोषवाक्ये जशी एखाद्या उत्पादनाच्या विक्रीत वाढ होण्यास कारणीभूत होते. तशीच एखादी घोषणा लोकांना पसंत पडली तर तिचा गवगवा होऊन अखेर त्या पक्षाला त्याचा मतात फायदा होतो. ही किमया भाजपने २०१४ मध्ये करुन दाखविली होती. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांचीच कास धरली असून सध्या उपग्रह वाहिन्यांवर ‘लाज कशी वाटत नाही’ या जाहिरातीची धुम पहायला मिळत आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘अब की बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य मोठा परिणाम करुन गेले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणूकीत भाजपने राज्यात ‘कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ ही जाहिरात मोहिम राबविली होती. त्यात विविध क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीच्या काळात कसा मागे पडत आहे. यावर भर देण्यात आला होता. भाजपला मिळालेल्या यशात या जाहिरात मोहिमेचा वाटा सिंहाचा होता. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने अशीच ‘लाज कशी वाटत नाही’ ही जाहिरात मोहीम आखली असून सध्या ती सर्वच चॅनेलवर धुमाकुळ घालत आहे. त्यात नोटाबंदीच्या रांगेत आपले वडिल कसे गेले हे सांगताना एक तरुणी या सरकारला पुन्हा मत मागताना लाज कशी वाटत नाही असा प्रश्न करताना दिसते. तसेच नोकरी मागणाऱ्या वडिल मुलाला नेता पकोडे तळा असा सल्ला देणारी, शिक्षक भरती न झाल्याने पाच वर्षे बेरोजगार राहिलेला तरुण, मुली पळविण्याची भाषा करणारे सत्ताधारी अशा वेगवेगळ्या जाहिरातींचा भडिमार महाआघाडी कडून सुरु झाला आहे. त्यातून गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या केंद्र व राज्यातील नाकर्तेपणावर टिका केली आहे.

२०१४च्या अशाच अतिशयोक्तिपूर्ण जाहिरातीचा भाजपला मोठा फायदा झाला होता. त्याच पावलावर पाऊल टाकणाऱ्या महाआघाडीला या कॅम्पेनचा किती फायदा होईल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.