‘भारतात सत्तांतर झाल्यास…’, इस्राईलच्या राजदुतांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा पार पडला असून अजून दोन टप्पे बाकी आहेत. येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. भारतात सत्तांतर झाल्यानंतरही इस्राईल आणि भारताच्या संबंधांवर काहीही फरक पडणार नसल्याचे वक्तव्य इस्राईलचे राजदूत रॉन मल्का यांनी केले आहे. मल्का यांनी इस्राईलच्या ७१व्या स्वतंत्र दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले भारत आणि इस्राईल विविध क्षेत्रातील आपले संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या दोन टप्प्यातील मतदान बाकी असताना इस्राईलचे राजदूत रॉन मल्का यांनी भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीविषयी इस्राईलचे राजदूत रॉन मल्का यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. रॉन मल्का म्हणाले की, ‘भारत आणि इस्राईल यांच्यातील राजकीय संबंध समान मूल्य आणि एका विशिष्ट दृष्टीकोनावर अवलंबून आहेत. येणाऱ्या काळात उभय देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील. भारतात एनडीए सरकार पुन्हा सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले तरी उभय देशातील संबंधावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. तसेच संबंधांत बदल करण्यासाठी काहीही कारण दिसत नाही. हे दोन्ही देशांतील संबंध असून सत्तेत कोण आहे, याला महत्त्व नाही.’

भारत-इस्त्रायल संबध फार जुने आहेत. शेती, पाणी, सैन्य या क्षेत्रात दोन्ही देशात अतिशय व्यापक सहकार्य आहे. इस्त्रायलने या तिन्ही क्षेत्रात केलेल्या संशोधनाचा लाभ आपल्याला मिळत आहे. आज हा देश आपल्यासाठी महत्त्वाचा भागिदार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताला आत्मरक्षणाचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हणत इस्रायलने भारताला पाठिंबा दर्शवला होता. तसेच भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत असे इस्त्रायलचे राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी म्हटले होते.