शहीद करकरेंबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन साध्वीची माघार, मागितली माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशाचा शाप भोवला, असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. अखेर साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपलं विधान मागे घेत माफी मागितली आहे.

मी तुरूंगात गेल्यानंतर लगेच दीड महिन्यात दहशदवाद्यांनी हेमंत करकरेंना मारलं या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी साध्वी यांच्यावर टीका केली. तसेच भाजपने देखील याप्रकरणात हात झटकले. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपले विधान मागे घेत असल्याचे म्हटले आहे. माझ्या विधानामुळे शहीदांच्या कुटुंबियांना त्रास झाला. शिवाय, विरोधकांना त्याचा फायदा होता कामा नये. त्यामुळे मी माझे विधान मागे घेत असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नसून त्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही. २६/११ च्या हल्ल्यात जे पोलीस अधिकारी शहीद झाले ते शहीदच आहेत असे भाजपचं मत आहे. अशी भूमिका भाजपचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी मांडली. यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. असे असतानाही त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध का खटला दाखल केला नाही असा सवाल उपाध्ये यांनी व्यक्त केला.