परभणीत युती – आघाडीत थेट लढत ; वंचित बहुजन आघाडी ठरणार निर्णायक

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – परभणी लोकसभा मतदार संघातून १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, युतीचे उमेदवार संजय जाधव आणि आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात ही थेट लढत होणार आहे. परंतु, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्या मतांवर या निवडणूकीत कोणाचा विजय होणार हे अवलंबून राहणार आहे.
आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. २६ मार्चला शिवसेना – भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी सकाळी १२ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्याच दिवशी संध्याकाळी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, संजय जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येणार होते. मात्र, आदित्य ठाकरे आले नाहीत. तर दुसरीकेडे राजेश विटेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले येणार होते मात्र, तेही आले नाहीत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा झाली.
विशेष म्हणजे, २७ उमेदवारांनी परभणी लोकसभा मतदारसंघासाठी ३७ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६ उमेदवारांचे ७ अर्ज छाननीत नामंजूर झाले. त्यानंतर २९ मार्च रोजी चार उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेतली. त्यामुळे आता १७ उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे. परंतु, युतीचे उमेदवार संजय जाधव आणि आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात ही थेट लढत होणार आहे. परंतु, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान  यांच्या मतांवर या निवडणूकीत कोणाचा विजय होणार हे अवलंबून राहणार आहे.