राजकारणात येण्यासाठी आयकर आयुक्तांचा राजीनामा

मेरठ : वृत्तसंस्था – देशात लोकशाहीचा गाजावाजा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक नेते मंडळी सोयीनुसार पक्ष प्रवेश करत आहेत. त्यामुळे पक्ष प्रवेशांचे सत्र सध्या सुरू आहे. मेरठ येथे कार्यरत असलेल्या आयकर विभागातील विशेष आयुक्त प्रीता हरित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

बुधवारी दि. २० ला उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रमुख राज बब्बर यांच्या उपस्थितीत प्रीता हरित यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे. प्रीता यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

प्रीता या मुळच्या हरियाणाच्या आहेत. पूर्वीपासूनच दलितांच्या अधिकारांसाठी त्या सक्रिय राहिल्या आहेत. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दलितांना अधिकार मिळावा यासाठी त्यांनी अभियान सुरू केले. प्रीता हरित नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. प्रीता हरित यांनी दनकौर येथे दलित महिलांवरील अत्याचारावर तिखट प्रतिक्रिया नोंदवली होती. याप्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीचीही मागणी केली होती. त्यामुळे प्रीता यांच्या स्वरुपात काँग्रेसला चांगला कार्यकर्ता आणि उमेदवार मिळाला आहे.