किरीट सोमय्या मागणार उद्धव ठाकरेंची माफी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी उघडलेल्या मोहिमेचा आज अंत होण्याची शक्यता आहे. भाजपचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड हे किरीट सोमय्या यांना घेऊन उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. या भेटीसाठी लाड यांनी उद्धव ठाकरे यांची वेळ देखील घेऊन ठेवली आहे. या सर्व बाबी व्यवस्थित पार पडल्या तर आज किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांमधील वाद मिटण्याची शक्यता आहे.

प्रसाद लाड यांना अद्याप मातोश्रीतून अधिकृतरित्या वेळ मिळाली नाही, अशी देखील माहिती समोर येते आहे. लाड हे किरीट सोमय्या यांना घेऊन मातोश्रीवर जातील आणि तेथे किरीट सोमय्या हे माफी मागतील असे बोलले जाते आहे. किरीट सोमय्या यांनी माफी मागताच या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

भाजप – शिवसेना या दोन पक्षात शीतयुद्ध सुरु असताना किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत हल्ला केला होता. सोमय्या यांच्या टीकेने ठाकरे दुखावले गेल्याने शिवसैनिकांच्या भावना सोमय्या यांच्या बद्दल अत्यंत टोकाच्या बनल्या आहेत. तर इकडे भाजपच्या नेत्यांमध्ये संजय राऊत यांनी मोदी आणि फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकांमुळे देखील नाराजी आहे. त्यामुळे हे प्रकरण शिवसेनेकडून अधिक ताणले जाण्याची शक्यता नाही. तसेच आज ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीचा रस्ता मोकळा होण्याची शक्यता आहे.

Loading...
You might also like