महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लोकसभेला असणार सर्वाधिक तरुण मतदार

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून २०२० या वर्षी उदयाला येणार आहे. त्याचाच प्रत्येय अकोला जिल्ह्यातील तरुण मतदारांची संख्या पाहून येतो आहे. लोकसभेसाठी अकोला जिल्ह्यात एकूण १५ लाख ८७ हजार २५७ मतदार असून १८ ते ३९ वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ६ लाख ९४ हजार १५० मतदार आहेत. हि संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे अकोला हा मतदारांच्या दृष्टीने सर्वात तरुण जिल्हा ठरला आहे.

देशाच्या राजकारणात तरुणांची भूमिका महत्वाची ठरते म्हणून तरुणांना हाताशी धरून राजकारण खेळण्याचा प्रकार सर्वच राजकीय पक्षांकडून केला जातो. त्यात अकोल्याच्या राजकारणाला तरुण मतदार काय वळण देणार हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

अकोला लोकसभा मतदार संघात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम,अकोला पूर्व,मूर्तिजापूर आणि वाशीम जिल्ह्यातील रिसोड हे सहा विधान सभा मतदारसंघ येतात. १८ लाख ५७ हजार ९५१ मतदार या मतदारसंघात समाविष्ट होतात. त्यापैकी अकोला जिल्ह्यातील १५ लाख ८७ हजार २५७ मतदारांचा समावेश या मतदारसंघात आहे. या मतदारसंघात १८ ते ३९ या वयोगटातील तरुणांची संख्या हि ६ लाख ९४ हजार १५० एवढी आहे. एवढ्या मोठ्या तरुण मतदारसंघचा अकोला हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे.

अकोला जिल्ह्यातील मतदारांची वयोगट निहाय वर्गवारी
वयोगट मतदार
१८ ते १९ २६,४५९
२० ते २९ ३,०२,०४१
३० ते ३९ ३,६५,६५३
४० ते ४९ ३,३०,२३७
५० ते ५९ २,४३,१४४
६० ते ६९ १,५१,०६३
७० ते ७९ ८३,४६८
८०आणि त्यापेक्षा अधिक ५३,७१५