पवार साहेब भाषणादरम्यान रिटायरमेंटच्या भूमिकेत दिसतात : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पवार साहेब आता भाषण करताना रिटायरमेंटच्या भूमिकेत दिसतात. पवार साहेब मोठे नेते आहेत पण आज दुर्दैवाने किंवा सुदैवाने म्हणा… जनता त्यांच्यासोबत नाही, त्यांच्याकडे नेतृत्व द्यायला तयार नाहीत अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसला देशद्रोहाचा पुळका का आला आहे ? काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधानाची मागणी होत आहे, मतं मिळवण्यासाठी काँग्रेसची बौद्धिकतेची दिवाळखोरी निघाली काय ? असा प्रश्न पडत असल्याचे मुख्यंमत्र्यांनी म्हंटले. मोदींनी आणलेल्या योजना देताना लाभार्थी हिंदू आहे की मुस्लीम हे आम्ही विचारले नाही. काँग्रेसने पंन्नास वर्षे मुस्लिमांना फसवले, असे म्हणत भाजपा हा केवळ हिंदूंचा पक्ष नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शरद पवारांवर वैयक्तिक आकस नसला, तरी त्यांचे राजकारण महाराष्ट्राने नाकारले आहे. शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. राष्ट्रवादी हा पक्ष भ्रष्टाचारामुळे बदनाम झाला असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. काही महिन्यांपूर्वी मोदी यांनी शरद पवार हे आपले गुरु असल्याचे म्हटले होते. यावर बोलाताना फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी देशाचे कृषीमंत्री शरद पवार होते. तेव्हा ते गुजरातमध्ये जायचे आणि तिकडे मदत करायचे. म्हणून मोदींना त्यांच्यांकडून शिकायला मिळालं असे म्हटल्याचे त्यांनी सांगितले.