‘बसपा’ आणि ‘सपा’ बाबत राहुल गांधींचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचे मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अद्याप काही दिवस बाकी असले तरी विरोधी पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांमध्ये युती होईल, असे संकेत दिले आहेत. तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती निवडणूक निकालानंतर भाजपसोबत जाणार नाहीत, असा दावाही केला आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, ‘मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी काँग्रेस, बसपा आणि सपा एकाच विचारधारेतील आहेत. विरोधकांमध्ये काँग्रेसची भूमिका प्रथम श्रेणीची असेल. देशातील विविध पक्ष निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील. यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या अनुभवाचा लाभ घेता येईल. मायावती आणि अखिलेश यादव भाजपसोबत जातील, असं वाटत नाही.’

विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी १९ मे रोजी होणारे शेवटच्या फेरीतील मतदान आणि २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांनी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. ही बैठक २१ मे रोजी आयोजित होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात आघाडी झालेली आहे. त्यांनी आघाडीत काँग्रेसला सामील करून घेतले नसले तरी या दोन्ही पक्षांनी अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ काँग्रेसला सोडले होते. लोकसभेसाठी उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पार्टी ३८ तर समाजवादी पार्टी ३७ जागांवर निवडणूक लढवली आहेत. काँग्रेस उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपने ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या.