…तर संघानं मोदींना पीएम केलं असतं का ? : मायावती

लखनऊ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा जवळ येत आहे, तसतसे आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडू  लागल्या आहेत. आता उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. त्यांनी म्हटले आहे कि, राजकीय स्वार्थापोटी मोदी ओबीसी असल्याचे म्हणत आहेत. मोदी जन्मानं ओबीसी असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांना पंतप्रधान केलं नसतं, असं मायावतींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महागठबंधन जातीयवादी असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना मायावतींनी म्हटले आहे कि, मोदींनी महागठबंधनवर केलेला जातीवादाचा आरोप हास्यास्पद आणि अपरिपक्व आहे. जातीवादाचा अभिशाप असलेले पीडित जातीवादी कसे काय असू शकतात ? ट्विट करून त्यांनी हे भाष्य केले आहे. मोदी जन्मानं ओबीसी नसल्याने त्यांना जातीयवादाचा सामना करावा न लागल्याने ते अशा प्रकारचे विधान करत आहेत, असेही मायावतींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान मोदी राजकीय स्वार्थासाठी स्वतःला ओबीसी म्हणून सांगत आहेत. मायावतींनी कल्याण सिंह यांचा उल्लेख करत संघावर निशाणा साधला. कल्याण सिंह मागासवर्गीय असल्यानंच त्यांना संघानं बाजूला सारलं, असा आरोप करत मायावतींनी संघावर शरसंधान साधलं आहे.

दरम्यान, मोदी यावर काय भाष्य करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.