राज ठाकरेंनी उपस्थित केलेले ‘हे’ प्रश्न मोदींनी टाळले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नोटबंदीच्या वेळी झालेला घोटाळा आणि त्याआधी अनेक शहरात खरेदी केलेल्या जमिनी, मुद्रा योजनेतील पैशांचा घोटाळा, काश्मीरमध्ये सैन्यावर कारवाई करण्यासाठी दिलेले आदेश आणि डिजीटल इंडियाचे दाखवलेल्या स्वप्नांचे काय झाले, असे अनेक प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यावर उत्तर देतील असे सर्वांनाच वाटले होते. मात्र, मोदींनी राज ठाकरे यांच्या प्रश्नांना बगल दिली. लातूर जिल्ह्यातील औसा येथे मोदींची आज सभा झाली.

मागील आठवड्यात गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीका केली होती. मोदी सरकार जनतेला कशा पद्धतीने फसवते, याचे पुरावे देखील त्यांनी दिले होते. त्यानंतर मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर उत्तर देतील असे वाटले होते. मात्र, राज ठाकरे यांचे दावे आणि उपस्थित केलेले प्रश्न टाळले. लातूर येथील सभेत मोदींनी काँग्रेसवर कडाडून टीका करताना भाजपच्या जाहिरनाम्याविषयी माहिती दिली. यावेळी मोदींनी शरद पवार यांना पुन्हा लक्ष केले. तसेच भाजपचा राष्ट्रवाद येथील जनतेला पटवून दिला. मात्र, मोदींनी राज यांच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर किंवा त्यावर भाष्य केले नाही.

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. ते निवडणुकीदरम्यान राज्यामध्ये सभा घेणार आहेत. राज यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली असून ते महाआघाडीच्या नेत्यांसाठी सभा घेणार आहेत. त्यांची पुढील सभा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये होणार आहे. याच नांदेडमध्ये मोदींची सभा झाली होती. त्यामुळे नांदेडमध्ये राज ठाकरे काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.