नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती : शरद पवार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला. तथापी पाच वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती असल्याचे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाचे चार न्यायाधीश पत्रकारपरिषद भरवतात. रिझर्व्ह बँकेतील हस्तक्षेपामुळे गव्हर्नर राजीनामा देतात. सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या घरच्या बैठकीतून रात्री दोन वाजता बदली केली जाते. राज्यघटना बदलण्याची भाषा वापरली जाते, ही देशावरील संकटेच आहेत.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मोदी, फडणवीस म्हणतात गांधी घराण्याने देशासाठी काय केले ? गर्भश्रीमंत असताना नेहरूंनी देशासाठी ११ वर्षे तुरुंवास भोगला. या देशातल्या गरीब माणसाची गरिबी घालवण्यासाठी इंदिरा गांधी यांनी गरीबी हटाओ चा नारा दिला. त्यांना जगण्याची हिंमत आणि किंमत दिली. पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवून थेट बांग्लादेशाची निर्मिती केली. इतिहास नव्हे, भूगोल निर्माण केला. तुमच्या खिशातील मोबाईल ही राजीव गांधी यांची देण आहे. मोदींनी सत्ता मिळाल्यावर काय केले, असा सवाल शरद पवार यांनी विचारला.

जिनिव्हा करारनुसार कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तानने सोडले. अभिनंदनच्या शौर्याचा राजकीय लाभ घेऊ नका, असे त्यांच्या माता-पित्यांना सांगावे लागते. ५६ इंच छाती दाखविणाऱ्या मोदींनी पाकिस्तानात अडकलेल्या कुलभूषण जाधवांना का सोडले नाही, कुठे गेली त्यांची ५६ इंच छाती, असा रोखठोक सवाल शरद पवारांनी केला.