‘किरीट सोमय्या अभ्यासू खासदार ; त्यांना विरोध हा शिवसेनेचा रडीचा डाव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – किरीट सोमय्या हे अभ्यासू खासदार आहेत. त्यांची कामगिरीही चांगली आहे. किरीट सोमय्या हे चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. सोमय्या यांना विरोध करून शिवसेना रडीचा डाव खेळत आहे अशी टीका खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. लांजा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

ईशान्य मुंबईमधून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीस शिवसैनिकांचा तीव्र विरोध आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याने शिवसैनिकांमध्ये सोमय्या यांच्याबद्दल संताप आहे. भाजपाने जर समोय्या यांना उमेदवारी दिली तर शिवसेना त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करेन किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात येईल अशा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान सोमय्या यांच्यासाठी भाजपा आणि स्वत: सोमय्या या प्रकरणामुळे मातोश्रीवर जात आहेत आणि होकाराची वाट पाहत आहे. याच मुद्द्यावर नारायण राणे यांनी भाष्य करत शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना राणे म्हणाले की, “शिवसेना हा थापा मारणारा पक्ष आहे, शिवसेना कशी आहे हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो त्यामुळे मला सगळे ठाऊक आहे. युती होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत उद्धव ठाकरे म्हणत होते, काही झाले तरीही युती करणार नाही. युतीमुळे आमचे नुकसान झाले, आम्ही खड्ड्यात गेलो. आता फक्त सत्तेसाठी युती करण्यात आली आहे. पाच वर्षांनी यांची भाषा बदलली ती फक्त निवडणुका आल्यामुळेच” असा घणाघातही नारायण राणेंनी यावेळी केला.

Loading...
You might also like