शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराबाबत शिवसेनेची मावळमध्ये पोस्टरबाजी

मावळ (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मावळमध्ये शिवसेनेकडून शेतकऱ्यांवर गोळीबार झालेल्या घटनेचा प्रचारामध्ये मुद्दा विरोधकांकडून उचलून धरण्यात येत आहे. या घटनेचे पोस्टर्स लावून, पार्थ पवार यांनी यांची उत्तरे द्यावी असे म्हटले आहे. यावर अजित पवार यांना विचारले असता, पाच वर्षे तुमचे सरकार होते तर मग तुम्ही का चौकशी केली नाही. असा सवाल त्यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यातील पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर या मोर्चाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रवादी सत्तेवर असताना शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराबाबत शिवसेनेने मावळमध्ये पोस्टरबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

पोस्टरबाजीवरुन अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ”या प्रकरणाला आता पाच वर्ष पूर्ण झाली. या काळत केंद्रात आणि राज्यात तुमचीच सत्ता होती. पोलीस यंत्रणाच नव्हे, तर पालकमंत्रीसुद्धा तुमचेच होते. मग गेल्या पाच वर्षात या प्रकरणाची चौकशी का केली नाही?” असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. ”मुळात ‘शेतकरी’ ही आमची जात आहे. लोकांनासुद्धा माहिती आहे तेव्हा काय घडलं होतं. सरकारनं आता फक्त त्या प्रकरणात काय निष्पन्न झालं याचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, तेव्हाच वस्तूस्थिती समोर येईल. या विषयावरून केवळ मतांचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असंही अजित पवार म्हणाले.