कसलंही वारं आलं तरी बारामतीत पवारच : सुप्रिया सुळे

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – मागील पाच वर्षात भाजप सरकारने जाहिरातींवर तब्बल १० हजार ११० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. हेच पैसे देशाच्या विकासासाठी वापरले असते तर चांगले झाले असते. देशात आणि राज्यात कसलही वारं आलं तरी बारामतीत पवारच येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजप सरकारनं जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च केलेत. स्वत:च्याच जाहिराती करण्यासाठी हे पैसे खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे आपण या निवडणूकीत कोणतंही सरकार आलं तरी संसदेत आवश्यकतेशिवाय इतर कामांसाठी जाहिरातीच करायच्या नाहीत, याबद्दलचं विधेयक मांडणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

आजपर्यंत कोणाचीही हवा आली तरी बारामतीत पवारांचीच हवा असते, असं सांगत त्यांनी कुणाला बारामतीत झालेला विकास दिसत नसेल तर आपण त्यांच्या डोळ्यांवर मोफत उपचार करुन त्यांना विकास दाखवू असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. बारामती तालुक्यात गाव भेट दौर्‍यात त्या बोलत होत्या.

सेल्फीवरुन होणार्‍या टीकेबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सेल्फी काढण्यात गैर काय? असा सवाल उपस्थित केला. आजच्या तरुणाईत सेल्फीची फॅशन वाढली आहे. त्यामुळं आपल्यासह विरोधकही सेल्फी काढत असतात. मात्र, आपण जेव्हा खड्ड्यांसोबत सेल्फी काढतो ते सत्ताधार्‍यांना खटकत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण प्रसिद्ध केलेल्या अहवालात विकासकामांचे अनेक फोटो त्यांना पहायला मिळतील असा टोलाही त्यांनी लगावला.

Loading...
You might also like