खोटे बोलून मते मिळणार नाहीत , हे उमगल्यामुळेच शरद पवारांची माघार …!

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस व पवार घराण्यावर राज्याचे महसूलमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. गडहिंग्लज येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की , ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला जमले नाही ते आम्ही चार वर्षात करून दाखविले आहे. त्यामुळे खोटे बोलून मते मिळणार नाहीत , हे समजल्यामुळेच शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली आहे . सुप्रिया सुळे लढतील मात्र त्या पडतील …!

देशाच्या विकास कामांविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की , ‘२०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. तोपर्यंत जनतेला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे.’ रस्तेबांधणी, मेट्रो व बुलेट ट्रेनबरोबरच अर्धवट राहिलेली धरणे पूर्ण करून कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्याबरोबरच शेतीमजुरीचा कामाचा रोजगार हमीच्या कामात समावेश करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

माढा, बारामतीसह सर्वच जागा जिंकू

यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वयात लोकसभा निवडणूक लढवू नये , अशी अपेक्षा होती. तरीही त्यांनी माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला ; परंतु त्यांना इतिहासात पहिल्यांदाच हरावे लागणार आहे , असे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी केले होते . भाजप-शिवसेना ४३ नव्हे तर सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकेल. यामध्ये शरद पवारांचा माढा मतदार संघ व बारामती मतदार संघही असेल , असे पाटील यांनी वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी त्यांना हिंमत असेल तर तुम्ही माढ्यातून लढाच. तुम्हाला चितपट केलं नाही तर नाव सांगणार नाही,’ असे खुले आव्हान दिले होते.