आता मोदींचा काँग्रेसवर स्ट्राईक, काँग्रेस अडचणीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक अशा मोहिमा मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा यशस्विरित्या करण्यात आल्या. त्यामुळे सभांमध्ये त्यांचा उल्लेख करून जवानांचे कौतुक केले जाते. यावर काँग्रेससह विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. मात्र सैन्याचे श्रेय घेण्याची सुरुवात ही काँग्रेसने केली असून १९७१ मध्ये झालेल्या युद्धाचे क्रेडिट काँग्रेसने घतले होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. मोदींच्या या हल्ल्यानंतर काँग्रेस अडचणीत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्रजी वृत्तपत्र दिलेल्या मुलाखतीत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

सुरक्षादलांच्या कामगिरीवरून राजकारण केल्याचे आरोप करणारे कोण लोक आहेत ? असा प्रतिप्रश्न करत मोदी म्हणाले ज्या लोकांनी १९७१ च्या युद्धाचे क्रेडिट घेतले, आणि आता आमच्यावर आरोप करणारे हे तेच लोक आहेत. आर्यभट्ट कृत्रिम उपग्रहाचे क्रेडिट त्यांनी घेतले होते. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात शेवपेट्यांच्या घोटाळ्याचे खोटे आरोप ही त्यांनी केले नव्हते का ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानविरोधात युद्ध करत बांगलादेशाची निर्मिती केली होती. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार होते. त्याचे श्रेय इंदिरा गांधींना दिले जाते. त्यांचे कौतुक करण्यात आले होते. इतकेच नाही तर विरोधीपक्षाचे तत्कालीन नेते, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील संसदेत इंदिरा गांधी यांची प्रशंसा करत त्यांना ‘दुर्गा’ असे म्हंटले होते.

आपली भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, विंग कमांडर अभिनंदन परतले नसते तर काँग्रेस आणि विरोधक शांत बसले असते ? मोदींना काही बोलले नसते ? त्यांनी तर कँडल मार्चची तयारी देखील केली होती, असेही मोदी म्हणाले. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर कारवाई केली नसती तर त्यांनी मोदींना दोष दिला नसता का ? असा सवाल करतानाच मोदी म्हणाले की सैन्य देशाचे आहे, पराक्रम देखील देशाचा आहे आणि निवडणुकाही देशाच्याच आहेत.