‘त्या’ केसमध्ये राहुल गांधींना क्लीन चिट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तामिळनाडू येथे विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद हे आचारसंहितेचे उल्लंघन नाही असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. याबाबत तामिळनाडूचे मुख्य निवडणूक आयुक्त सत्यव्रत साहू यांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, ‘राहुल गांधी यांनी चेन्नई येथील मॅरिस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. याबाबत तक्रारीनंतर स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशी केली त्यामध्ये त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केलेले नाही.’

काय आहे अहवाल ?

निवडणूक आयोगाने दिलेल्या अहवालानुसार, महाविद्यालयाच्या प्रशासनाने आयोगाच्या परवानगीनंतरच १३ मार्च रोजी राहुल यांचा विद्यार्थ्यांबरोबरील कार्यक्रम आयोजित केला होता. पूर्वपरवानगी घेतल्याने हा आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही. दरम्यान, राहुल यांनी या कार्यक्रमात भाषण केल्याप्रकरणी साहू यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अग्रिम अहवाल मागितला आहे.

उल्लेखनीय म्हणजे राज्य सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरही महाविद्यालयीन प्रशासनाला राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला कशी परवानगी दिली, असा सवाल राज्य सरकारने केला होता. या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास नोकरीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.

‘डोन्ट कॉल मी राहुल’चा व्हिडीओ व्हायरल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे तामिळनाडू दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी चेन्नई येथील ‘स्टेला मॅरीस कॉलेज फॉर वुमन’च्या विद्यार्थिंनींशी संवाद साधला. यावेळी आझरा नावाच्या विद्यार्थिनीनं राहुल गांधी यांना प्रश्न विचारताना ‘सर’ म्हणून संबोधलं. यावेळी राहुल गांधी यांनी तिला मध्येच थांबवून तुम्ही मला ‘सर’ ऐवजी फक्त ‘राहुल’ म्हणा असं सांगताच ती काहीशी लाजली. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रश्न विचारताना तिनं राहुल गांधींचा एकेरी नावानं उल्लेख करताच संपूर्ण सभागृहात जोरदार हशा पिकला होता. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.